सिन्नर,दि.७)-पंधरा दिवसापुर्वी सिन्नर शिर्डी राष्ट्रीय महामार्गावर मिरगाव फाटा परिसरात दुचाकीवरून कोपरगाव कडे जाणाऱ्या एकाच अडवून तिघा जणांनी मारहाण केली होती.या घटनेत त्याच्याजवळील पंधरा हजार रुपये रोख रक्कम,दुचाकीची चावी घेऊन हल्लेखोर पसार झाले होते.वावी पोलिसांनी या प्रकरणात तिघा जणांना अटक केली आहे.
सुधाकर वक्ते वय ३५ हे वावी येथे पॅथॉलॉजिकल लॅब चालवतात. मारहाणीची घटना घडली त्या दिवशी ते नेहमीप्रमाणे कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी येथे घरी जात असताना सायंकाळी आठ वाजेच्या सुमारास दोन दुचाकीवरून आलेल्या चौघाजणांनी वक्ते यांना मिरगाव फाटा परिसरात दुचाकी आडवी मारून थांबण्यास भाग पाडले. त्यांना लाथा बुक्क्यांनी व हातातील दांड्याने मारहाण करत खिशातील १५ हजार रुपये व दुचाकीची चावी हिसकावून घेतली होती.
मारहाण करणारे त्यांच्या दुचाकीवरून कोपरगावच्या दिशेने पसार झाले होते.याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात रस्ता लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने तपास करून दि.६ रोजी तिघांना अटक केली.
महेश बाबुराव सोळके (२४) मुळ राहणार जेऊर कुभारी, ता. कोपरगाव, सध्या राहणार धात्रक फाटा, नाशिक. धीरज नंदकिशोर गुंडगळ (२४) राहणार हरीदर्शन अपार्टमेंट, वृंदावन कॉलनी, जत्रा हॉटेल, नाशिक. भागवत भारत बांगर (२५) मुळ राहणार लोखंडे वस्ती वडवणी जि. बीङ सध्या राहणार धात्रक फाटा के. के वाघ कॉलेज जवळ नाशिक अशी अटक केलेल्या तिघांची नावे असून त्यांचा चौथा साथीदार फरार आहे.पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकी देखील ताब्यात घेतल्या असून सिन्नर न्यायालयात हजर केले असता त्यांना उद्या सोमवारपर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.