नॅचरल उद्योग समूहात प्रतिदिन ५२ मे.टन.उत्पादित सेंद्रीय खत प्रकल्पाचा प्रारंभ

author
0 minutes, 2 seconds Read
Spread the love

जगदीशचंद्र जोशी,विशेष प्रतिनिधी

धाराशिव,दि.१८- नॅचरल उद्योग समुहात स्वातंत्र्य दिनी ६५ लाख रुपये गुंतवणूक करुन नॅचरल ऑरगॅनिक फर्टिलायझर (एनओएफ) या सेंद्रीय खत निर्मितीमधील नविन प्रकल्पाचा प्रारंभ नॅचरल उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष कृषी रत्न बी बी ठोंबरे यांचे हस्ते करण्यात आला.या वेळी विदर्भ अॅग्रो प्रा.लि.चे अध्यक्ष सुधीर जडे,जनरल मॅनेजर उध्दव दिवेकर उपस्थित होते.

यावेळी ठोंबरे म्हणाले नॅचरल उद्योगाने नेहमीच दूरदृष्टी व भविष्याचा वेध घेत वाटचाल केलेली आहे. सद्यस्थितीत गोठ्यातील गुरांची संख्या कमी झाल्यामुळे शेणखता सारख्या सेंद्रिय खतांची उपलब्धता कमी झालेली आहे. जमिनीचा पोत अबाधित ठेवण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर करण्याबाबत विविध कृषि विद्यापिठाकडून शिफारसी केल्या जातात, मात्र सेंद्रिय खतांची उपलब्धता कमी झाल्यामुळे शेतक-यांकडून फक्त रासायनिक खतांचा वापर केला जातो.

    परिणामी जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण ३ टक्के वरून ०.३ टक्क्यांवर आल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे जमिनीची सुपीकता कमी होवून जमिनी क्षारपड होत आहेत. जमिनीचा पोत अबाधीत राहण्यासाठी नॅचरल उद्योगाने मागील वर्षी नॅचरल ऑरगॅनिक (एनओएफ) या सेंद्रीय खत निर्मितीला सुरूवात केली आहे. मात्र या प्रकल्पाची क्षमता कमी असल्यामुळे व शेतक-यांकडून या सेंद्रीय खताला जास्तीची मागणी असल्यामुळे शेतक-यांना सदरील खत उपलब्ध होणेसाठी अडचणी येत होत्या.

    त्यासाठी नॅचरल उद्योगाने ६५ लाख रुपये गुंतवणूक करुन प्रतिदिन ५२ मेट्रीक टन उत्पादन क्षमतेचा, स्वयंचलित व अत्याधुनिक प्रकल्पाची उभारणी केली असून त्याचे उत्पादनास प्रत्यक्ष सुरूवात झालेली आहे. या सेंद्रीय खतामध्ये ३० ते ३५ टक्के सेंद्रीय कर्ब असून त्यामध्ये सिलीका,पोटॅश व गंधक असल्याने जमीनीचा पोत अबाधीत ठेवण्यासाठी ते फायदयाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

    तसेच आजच्या स्वातंत्र्यदिनी मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी त्यांचे भाषणामध्ये खताची आयात कमी करून स्वदेशी खत निर्मितीवर भर देण्याचे सुचविले आहे. त्या अनुशंघाने यापुर्वी खतासाठी पोटॅशची संपूर्णतः आयात केली जात होती परंतू नॅचरलमध्ये पीडीएम पोटॅश निर्मिती केल्याने शासनाचे धोरणास हातभार लागणार आहे. नॅचरल निर्मीत एनओएफ मध्ये पीडीएम पोटॅशचा वापर केला जात आहे.


    नॅचरल उद्योगाचा हेतू हा या परिसराचा सर्वांगिण विकास व शेतक-यांची आर्थिक समृध्दी आहे. या सेंद्रीय खतामुळे जमीनीचा पोत सुधारल्याने शेतक-यांचे उत्पन्नात वाढ होणार आहे. तसेच नॅचरल ऑरगॅनिक फर्टिलायझर(एनओएफ) या सेंद्रीय खताची विक्री बाजार भावापेक्षा पन्नास टक्के कमी दराने म्हणजेच ५० किलोची बॅग फक्त ३०० रूपयांमध्ये शेतक-यांना त्यांचे गावात उल्पब्ध होणेसाठी कारखान्याचे शेती गट कार्यालयामार्फत पुरवठा केला जात आहे. शेतक-यांनी आपल्या शेतीसाठी जास्तीत जास्त नॅचरल ऑरगॅनिक फर्टिलायझर(एनओएफ) या सेंद्रीय खताचा वापर करावा असे आवाहान श्री ठोंबरे यांनी केले.
    कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व प्रास्ताविक कृषीभूषण पांडूरंग आवाड यांनी केले तर प्रवर्तक किशोर डाळे यांनी आभार मानले.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *