जगदीशचंद्र जोशी,विशेष प्रतिनिधी
धाराशिव,दि.५-घरच्या घरी पिकांना लागणाऱ्या निविष्ठा तयार करून शेतीमधील रासायनिक खतांचा खर्च कमी करावा असे आवाहन विज्ञान संत अंकूश पाटील सांगली यांनी केले.
नॅचरल उद्योग समुहाचे रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त शेतीतील रासायनिक खताचा खर्च कमी करून आर्थिक उत्पन्न वाढवणेसाठी घरच्या घरी निविष्ठा निर्मिती प्रशिक्षण व मार्गदर्शन शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला.या कार्यक्रमात पाटील बोलत होते. मेळाव्याचे अध्यक्षस्थानी नॅचरल उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष कृषिरत्न बी. बी. ठोंबरे,पोलीस किसान पंढरपूरचे संस्थापक अध्यक्ष तथा निवृत्त उपविभागीय पोलिस अधिकारी नानासाहेब कदम, संचालक अनिल ठोंबरे,बालाजी तट,दिलीपराव भिसे, विष्णू मोहिते,जनरल मॅनेजर उध्दव दिवेकर, शेतकी अधिकारी अशोकराव गुजर,मदन सुर्यवंशी हे उपस्थित होते.

यावेळी बोलताना विज्ञानसंत अंकूश पाटील म्हणाले,शेतक-यांनी सदैव चौकस राहून नवनविन प्रयोग शेतीमध्ये करणे आवश्यक आहे. हजारो रूपये रासायनिक खतावर खर्च करण्यापेक्षा ती आपण स्वतः घरच्या घरी तयार करावी.घरच्या घरी विविध प्रकारचे खत तयार करणेसाठी लागणारे साहित्य व त्याची कृती त्यांनी सर्व उपस्थितांना समजावून दिली. शेतक-यांनी माहितीची देवाण घेवाण केल्याशिवाय त्यांची प्रगती होत नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
ठोंबरे म्हणाले नॅचरल उद्योगाने नवनविन तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यासह शेतक-यांच्या हिताचे व्रत्त हाती घेतलेले आहे.नॅचरल उद्योगाने जमीनीचा पोत सुधारण्यासाठी नॅचरल आॅरगॅनिक फर्टिलायझर (एनओएफ), फरमंटेड आॅरगॅनिक मॅन्युअर (एफओएम), पोटॅश, गंधक अशी उत्पादने नाममात्र दरात उपलब्ध करून दिलेली आहेत.शेतीमध्ये रासायनिक खताचा होणारा अतिरेकी वापर रोखण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील आहोत. त्यामध्ये आज घरच्याघरी निवीष्ठा तयार करून सेंद्रीय शेतीसह कमी खर्चात अधिक उत्पादन घेण्याचे तंत्रज्ञान आमचे शेतकरी बांधवाना मिळाले असल्याचेही त्यांनी सांगितले. शेतक-यांना घरच्या घरी निवीष्टा तयार करण्यासाठी लागणारे गुणवत्ता पुर्ण सर्व साहित्य व कमी खर्चात आम्ही कारखान्यामार्फत नॅचरल बझारद्वारे उपलब्ध करून देणार असल्याचे ठोंबरे यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संचालक कृषीभूषण पांडूरंग आवाड यांनी केले तर प्रवर्तक किशोर डाळे यांनी आभार मानले.