वावी,दि.५-सिन्नर-शिर्डी राष्ट्रीय महामार्ग क्र १६० वर काम करणाऱ्या मजुरांच्या झालेल्या अपघाताची चौकशी करावी,अतिक्रमणे कायमस्वरूपी काढावीत, जळालेल्या झाडांसंदर्भात ठेकेदारावर कारवाई करावी या मागण्यांसाठी दिपक वेलजाळी यांनी पिंपरवाडी टोला प्लाझा येथे बारा दिवस धरणे आंदोलन करूनही भारतीय राष्ट्रीय राजमार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी दखल न घेतल्याने शुक्रवारी दुपारपासून त्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.
त्यांनी अन्नत्याग आंदोलन करू नये यासाठी वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक गणेश शिंदे यांनी प्रयत्न केले परंतु आपल्या मागण्या संदर्भात योग्य कार्यवाही झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याचे दिपक वेलजाळी यांनी सांगितले.वावी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आंदोलन स्थळी वेलजाळी यांची तपासणी केली असता त्यांचा रक्तदाब वाढल्याचे आढळून आले. रक्त पातळ होण्याची नियमित गोळी गेल्या दोन दिवसांपासून त्यांनी घेतली नसल्याने प्रकृतीला धोका निर्माण होऊ शकतो असा अहवाल आरोग्य विभागाने वावी पोलीस ठाण्यास दि.५ रोजी दिला.