गणेश ओझा,प्रतिनिधी
सिन्नर,दि.२३-येथील नूतन विद्यालय व अँड.रावसाहेब शिंदे कनिष्ठ महाविद्यालयात पदमभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांची १३८ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी कर्मवीरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून रथाचे पूजन करण्यात आले त्यानंतर गावांतून प्रभातफेरी काढण्यात आली.त्यात लेझीम पथक,टिपऱ्या पथक,झांजपथक त्याचप्रमाणे विविध पेहराव असणारे विद्यार्थी,समतेचा संदेश देणारे फलक,पर्यावरण जनजागृती फलक घेऊन विद्यार्थी प्रभात फेरीत सहभागी झाले.
रयत माऊली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य शहाजी मखरे यांनी केले तर अहवालवाचन पर्यवेक्षक नंदकुमार दिघे यांनी केले.प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते रांगोळी स्पर्धेचे उदघाटन करून गौतमनगर येथील उद्योजक राजेंद्र कापसे यांनी गरीब होतकरू विद्यार्थ्यांना ५० सायकलीचे वाटप करीत वाड्या-वस्तीवरून येणाऱ्या विद्यार्थ्यांची पायपीट थांबवली.

विद्यालयातील शिवाजी सरोदे,ज्योती आभाळे,निवृत्ती आहेर यांना गुणवंत आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.हौशीराम पवार व डुकरे सुधा यांना गुणवंत विद्यार्थी व गुणवंत विद्यार्थिनी पुरस्काराने गौरविण्यात आले तसेच गुरुकुल प्रमुख सुहास गावीत यांना रोटरी क्लबचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याने त्यांचाही गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा.लक्ष्मण कोल्हे यांनी कर्मवीर अण्णांचा जीवनपट आपल्या ओघवत्या शैलीमध्ये
मांडला.त्यानंतर १० वी,१२ वी प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना व क्रीडा स्पर्धेत विशेष कामगिरी केल्याबद्दल पारितोषिक वितरण करण्यात आले. विद्यालयाचे लेखनिक नितीन निकम यांनी एकगरीब विद्यार्थी दत्तक म्हणून घेत त्याचा संपूर्ण एका वर्षाचा खर्च करण्याचे जाहीर केले.
यावेळी स्कूल कमिटीचे चेअरमन रामनाथ कर्पे,सरपंच विजय काटे,राजेंद्र कापसे,बाळासाहेब भरीतकर,विठ्ठलराव राजेभोसले,दिलीप मंडलिक,दत्तात्रय वेलजाळी,दिलीप कपोते,नंदलाल मालपाणी,ईलाहीबक्ष शेख,कारभारी वेलजाळी,सुनीता भरीतकर,माजी मुख्याध्यापक,माजी विद्यार्थी,ग्रामस्थ,पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयाचे प्राचार्य शहाजी मखरे,उपप्राचार्य संतोष सोनवणे,पर्यवेक्षक नंदकुमार दिघे,शिक्षकवर्ग यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शोभा गेटम,वैशाली पवार,सविता मथुरे,सुहास गावीत,राजू नागरे यांनी केले तर आभार उपप्राचार्य संतोष सोनवणे यांनी मानले.