सिन्नर,दि.२६-नाशिक अहिल्यानगर जिल्ह्याला जोडणाऱ्या वावी कहांडळवाडी रस्त्याची अनेक वर्षांपासून झालेली चाळण व दुर्दशाबाबत निखिल भेंडाळे यांनी ग्रामस्थांबरोबर केलेल्या पोलीस ठाण्यातील आंदोलनाला यश मिळाले असून अर्थसंकल्पात १० कोटी रुपयांची मंजुरी दुरुस्तीसाठी मिळाली आहे.
रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाल्याने वाहन चालवणे तर लांबच पायी चालतानाही कोणता खड्डा चूकवावा आणि कोणता नाही असाच प्रश्न पडलेला असताना सामाजिक कार्यकर्ते निखिल भेंडाळे यांनी याप्रश्नी DPDC मधून मंजुरी मिळवण्यासाठी जिल्हा स्तरावर,सार्वजनिक बांधकाम मुख्य अभियंता,अधीक्षक अभियंता आणि कार्यकारी अभियंता यांच्याकडे वारंवार भेटी देऊन तांत्रिक अडचणी दूर करीत रस्ता अर्थसंकल्पामध्ये मंजूर होण्यासाठी विशेष प्रयत्न केले.रस्ता दुरुस्ती मंजूर झाल्याने परिसरातील दळणवळणाचा प्रश्न सुटणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
माझा हा विजय एकट्याचा नसून ज्या नागरिकांनी माझ्या संघर्षात साथ दिली त्या सर्वांचा आहे.रस्ता केवळ कागदावर मंजूर झाला यावर न थांबता तो दर्जेदार व्हावा आणि त्याचे काम लवकरात लवकर सुरू व्हावे यासाठी पाठपुरावा सुरूच राहील— निखिल भेंडाळे