जगदीशचंद्र जोशी,विशेष प्रतिनिधी
धाराशिव,दि.२५- गाळप हंगाम २०२४-२५ मधील साखर उद्योगातील विशेष व उल्लेखनीय कार्याबद्दल नॅचरल शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज लि.साईनगर रांजणी कारखान्याला दि डेक्कन शुगर टेक्नाॅलाॅजिस्ट असोसिएशन (डीएसटीए) च्या वतीने राज्यातील सर्वाेत्कृष्ट साखर कारखाना’ हया पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.या पुरस्काराचे वितरण कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे हस्ते पुणे येथे करण्यात आले.
यावेळी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील,राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर,सहकार आयुक्त दीपक तावरे, विस्माचे अध्यक्ष कृषिरत्न बी.बी.ठोंबरे,यशदाचे अतिरिक्त महासंचालक तथा नॅचरल शुगरचे स्वतंत्र संचालक डाॅ. शेखर गायकवाड,असोसिएशनचे अध्यक्ष एस.बी.भड,उपाध्यक्ष सोहन शिरगांवकर, संचालक पांडूरंग आवाड, संभाजीराव रेड्डी, उध्दव दिवेकर,बालासाहेब टेळे.उपस्थित होते.
नॅचरल शुगरने रांजणीच्या माळरानावर २५ वर्षांपुर्वी १२५० मे टन गाळप क्षमतेच्या कारखान्याची सुरुवात करून आज प्रतीदिन ५००० मेट्रीक टन गाळप क्षमतेच्या साखर कारखान्यासह विविध प्रकारच्या एकूण ३२ उपपदार्थ उत्पादनाचे प्रकल्प कार्यवाहीत केले आहेत. साखरेपासून ते ग्रीन हायड्रोजन पर्यंतचे सर्व उत्पादने घेण्याचा मान नॅचरल शुगरने पटकावलेला असल्याने व मराठवाड्यासारख्या अत्यंत मागासलेल्या भागातही साखर उद्योगांमध्ये नवनवीन प्रयोगाच्या माध्यमातून क्रांती घडवून आणल्यामुळेच नॅचरल शुगर ला हा राज्यातील सर्वोत्कृष्ट साखर कारखान्याचा बहुमान मिळाला.
यावेळी कृषिमंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले महाष्ट्रामध्ये मागील दोन – तीन वर्षाची आकडेवारी पाहिल्यास साखरेचा गाळप हंगाम तीन ते चार महिन्यामध्येच संपत आहे. त्याचा फटका कारखानदारांना, शेतक-यांना व कामगारांना बसत आहे,याचा सर्वांनी विचार करणे गरजेचे आहे.त्यामुळे हंगाम सहा महिने सुरू राहण्यासाठी ऊसाचे उत्पादन आणि साखरेचा उतारा वाढवण्याची गरज आहे.ऊसाचे नवीन वाण तसेच तंत्रज्ञानाचा वापर वाढविला पाहिजे,असा सल्ला पाटील यांनी दिला.कार्यक्रमाचे प्रस्ताविक असोसिएशनचे अध्यक्ष एस.बी.भड यांनी केले.यावेळी कार्यक्रमाला असोसिएशनचे पदाधिकारी,सदस्य तसेच विविध कारखान्याचे अध्यक्ष व अधिकारी उपस्थित होते.