संगमनेर,दि.१- संस्कृत ही केवळ प्राचीन भाषा नसून भारतीय ज्ञानपरंपरा, संस्कृती आणि संस्कारांचा समृद्ध वारसा पुढे नेणारी भाषा आहे. या भाषेची गोडी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्यासोबतच तिच्या समृद्ध परंपरेची ओळख करून देण्यासाठी स.ब.वि.प्र. समाजाचे सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या संस्कृत विभागाच्या वतीने आयोजित ‘संस्कृत दिन संस्कृत सप्ताह २०२६’ विविध उपक्रमांनी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
सप्ताहात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना आणि भाषिक कौशल्यांना व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने पोस्टर प्रेझेंटेशन, मेहंदी, संस्कृत निबंधलेखन, ऑनलाइन प्रश्नमंजुषा, वक्तृत्व, संस्कृत गीतगायन आणि स्तोत्रपठण अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी या उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग घेतला.विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुवर्ण, रौप्य व कांस्यपदके तसेच प्रशस्तीपत्रके देऊन गौरविण्यात आले.
ऑनलाइन प्रश्नमंजुषेत सहभागी झालेल्या प्राध्यापकांचाही यावेळी विशेष सन्मान करण्यात आला.सांगता समारंभाच्या प्रमुख व्याख्यात्या श्रीम. अनिता माळी (पदवीधर शिक्षिका, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, डोऱ्हाळे तथा संस्कृतभारती, अहिल्यानगर जनपद) यांनी संस्कृत भाषेचे महत्त्व, तिची समृद्ध परंपरा आणि आधुनिक काळातील उपयुक्तता यावर प्रेरणादायी मार्गदर्शन केले. संस्कृत भाषेतील ज्ञानाचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी विद्यार्थ्यांनी या भाषेशी आत्मीयतेने जोडले जावे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब वाघ होते. त्यांनी संस्कृत भाषेचा समृद्ध वारसा आणि भारतीय संस्कृतीच्या जडणघडणीत तिचे असलेले योगदान अधोरेखित केले. प्रा. डॉ. लक्ष्मण घायवट यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. आभार प्रदर्शन हिंदी विभागाच्या प्राध्यापिका डॉ. स्वाती ठुबे यांनी केले.विविध स्पर्धांचे परीक्षण प्रा.नानासाहेब दिघे, प्रा. फटांगरे, डॉ. दीपश्री गडाख, डॉ. स्वाती ठुबे, प्रा. नानासाहेब गुंजाळ व प्रा. ललिता महाले यांनी केले.
संस्कृत सप्ताहाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्य डॉ. बाळासाहेब वाघ, कार्यालयीन अधीक्षक पानसरे, IQAC समन्वयक डॉ. लक्ष्मण घायवट, परीक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले. संस्कृत विभागप्रमुख प्रा. मोहिनी काशिद यांनी सप्ताहाचे संयोजन केले.विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संस्कृत सप्ताहाला केवळ स्पर्धांचे स्वरूप न राहता संस्कृत भाषा, भारतीय संस्कृती आणि ज्ञानपरंपरेचा जागर घडविणारा उपक्रम म्हणून विशेष रंगत प्राप्त झाली.